इतर

एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी

माजी पालकमंत्र्यांसह अपक्ष उमेदवार पराभूत..

खान्देश टाइम्स न्यूज l पारोळा / एरंडोल l विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.

मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या आघाडीत वाढ झाली.त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळाली.मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी दिसून आली.सतत अमोल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.अमोल पाटील यांचा विजय निश्चित आहे हे कळल्यावर कार्यकर्त्यांनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा आमदार निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.

केंद्राबाहेर जे सी बी द्वारे आमदार अमोल पाटील यांच्यावर फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल पाटील यांना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.त्यानंतर वाचत गाजत आमदार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सांगता मरिमाता मंदिर परिसरात करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोल न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव,इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.मतदान केंद्रात सी आर पी एफ, एस आर पी एफ, पोलीस कर्मचारी, होमगार्डस् तसेच पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button