
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
रामानंदनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल, संशयित आरोपी अटकेत
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून घडलेल्या हत्येच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ खाण्यासाठी मागितलेली ‘खिचडी’ न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने ४० वर्षीय इसमाच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा मोठा दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खिचडी नाकारल्याने संतापाचा उद्रेक; डोक्यात घातला दगड
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शालिक पाथरकर (वय ४०, मूळ रा. रोटवड, ता. जामनेर, जि. जळगाव, सध्या रा. शाहूनगर, जळगाव) हे ८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता शाहूनगर परिसरातील एका मोकळ्या जागेत उपस्थित होते. त्याचवेळी संशयित आरोपी अंकुश नथ्थू पाटील (वय ४६, रा. समता नगर, जळगाव) तेथे आला आणि त्याने पाथरकर यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली.
मात्र, पाथरकर यांनी खिचडी देण्यास नकार दिल्याने आरोपीचा संताप अनावर झाला. या रागातून त्याने बाजूला पडलेला सिमेंट काँक्रीटचा जड दगड उचलून थेट पाथरकर यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत होऊन पाथरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
भाच्याच्या फिर्यादीवरून गुन्हा; आरोपी अटकेत
या घटनेनंतर मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून ८ जून २०२६ रोजी रात्री ११:५६ वाजता भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत मार्गदर्शन केले.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पुढील सखोल तपास करीत आहेत.
दरम्यान, क्षुल्लक कारणातून घडलेल्या या निर्घृण घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.





