
मिशन RISE अंतर्गत सावद्यात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात
सावदा | प्रतिनिधी मुख्तार शेख
जळगाव जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन RISE’ या अमली पदार्थविरोधी धडक मोहिमेअंतर्गत शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील (मुक्ताईनगर विभाग) हे होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी डॉ. नितीन विसपुते, संचालक, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव यांना प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनामुळे होणारे सामाजिक व कौटुंबिक नुकसान, युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याची गरज तसेच व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जळगाव जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेची माहिती देण्यात आली. अमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी नागरिक, पालक, युवक आणि सामाजिक संस्थांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास जेहरा मॅरेज हॉलचे हाजी अख्तर हुसैन इमदाद अली (बाबू शेठ), सूत्रसंचालक संजय महाजन, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगरसेवक .विशाल तायडे, इरफान मेंबर चिनावल, गजानन ठोसरे, , सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, सावदा नगरपरिषदेचे विद्यमान व माजी नगरसेवक, पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सामूहिक जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.





