
बंदी असलेल्या मांसाच्या विक्रीवर कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची मागणी
घरात घुसून तोतया पत्रकारांकडून खंडणीचा प्रयत्न; दोघांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक
जळगाव : बंदी असलेले मांस विक्रीचा आरोप करत कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची मागणी करणाऱ्या दोघा तोतया पत्रकारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कोमल बापुराव पाटील व जितेंद्र रूपसिंग चौधरी (दोघे रा. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी (७ ऑगस्ट) करण्यात आली.
पत्रकार असल्याचे सांगत घरात प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजता कोमल पाटील व जितेंद्र चौधरी हे फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसले. आपण पत्रकार असल्याचे सांगत त्यांनी बंदी असलेले मांस विक्री केल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
पैशांची मागणी सीसीटीव्हीत कैद
दोघे संशयित सकाळी घराजवळ आल्यापासूनचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर याच दोघांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पोलिसांच्या चौकशीत प्रकार उघड
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची खातरजमा केली. त्यावेळी संबंधित दोघांनी आधी पैशांची मागणी केली होती आणि मागणी पूर्ण होत नसल्याने पोलिसांना माहिती दिल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोमल पाटील व जितेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.





