जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजविणाऱ्या तिघांच्या मुस्क्या रामानंद नगर पोलिसांनी आवळल्या असून तरुणांकडून तीन गावठी पिस्तुलासह तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात तीन जण गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६
वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ प्रवृध्द गुलाब सपकाळे (वय २१ रा. हुडको), गौरव समाधान सोनवणे (वय २१ रा. गॉलेक्सी कॉलनी) आणि लिलाधर देवीदास कोळी (वय ३५ रा. हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रूपये किमतीचे तीन गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.