
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांचा बडगा; ५२६ कारवायांत सव्वा दोन लाखांचा दंड वसूल
ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४९ तळीरामांवर गुन्हे; उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांनाही दणका

जळगाव : जिल्ह्यात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांसह मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष धडक मोहीम हाती घेतली. संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५२६ बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांवरही प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी विविध चौकांमध्ये आणि महामार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार इतर नियमभंगाची ३५६ प्रकरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याची ६२ प्रकरणे, मद्यपान करून वाहन चालविण्याची (ड्रंक अँड ड्राइव्ह) ४९ प्रकरणे, कलम १९४ बी अंतर्गत ३१ प्रकरणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरण्याची १५ प्रकरणे, कलम ६६/१९२ अंतर्गत ०८ प्रकरणे, ट्रिपल सीट प्रवासाची ०४ प्रकरणे आणि विनापरवाना वाहन चालविण्याचे ०१ प्रकरण, अशा एकूण ५२६ प्रकरणांत कारवाई नोंदविण्यात आली.
या मोहिमेमध्ये अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि जळगाव, चाळीसगाव व भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन: मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम मोडणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवावर बेतू शकते. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



