यावल :- देवझिरी वन वनक्षेत्रात वृक्षांची तोड केल्याप्रकरणी कारवाई केल्याने संशयित आरोपीने कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला चोपडा न्यायलयाने तिन दिवसाची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यावल वनक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या देवझिरी वनक्षेत्र देवझिरी येथील राखीव वनखंड क्रमांक १६४मध्ये १२ मार्च रोजी खैरकुंडी पाडा येथील संशयित आरोपी कांतीलाल गुलाब पावरा याने अवैधरित्या वनक्षेत्रात प्रवेश करुन सागवान जातीच्या २५ वृक्षांची तोडणी केली होती. तसेच, कर्तव्यावर असलेल्या देवझिरी
वनक्षेत्रातील वनरक्षक विजय मोत्या पावरा व वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना देवझिरी वनक्षेत्र कार्यालयात जाऊन शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देत पोबारा केला होता.
यात फरार झालेल्या कांतीलाल पावरा यास यावल वनक्षेत्राचे उप वनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनात देवझिरी वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. बडगुजर, हंड्या कुंडया वनक्षेत्राचे वनपाल स्वप्नील रणदिवे यांनी गुप्त माहितीच्या आधारावर खैरकुंडी परिसरात सापळा रचून अटक केली आहे. त्यास चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यास २० मार्चपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.