जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार
महापौरांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न
जळगाव: जळगाव शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे महामार्गावरील अतिक्रमणवर आता महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी दुपारी जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, ‘नही’चे (NHAI) राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
*अजिंठा चौकातील भंगार बाजारावर होणार कारवाई*
शहरातील नेरी नाका ते अजिंठा चौक, अजिंठा चौक ते खेडी, अजिंठा चौक ते कुसुंबा आणि खेडी ते खोटे नगर या महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत या बैठकीत ठोस नियोजन करण्यात आले. विशेषतः अजिंठा चौकातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला भंगार बाजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुढील तीन दिवसांत या भागातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ही कारवाई करताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेने आता कंबर कसली आहे. शहरात ९५ रिक्षा स्टॉप असतानाही अनेक चालक रस्त्यात कुठेही वाहन उभे करतात. अशा बेशिस्त चालकांवर पुढील ८ दिवसांत कारवाई सुरू होईल. त्यापूर्वी रिक्षा चालकांची एक बैठक घेतली जाणार आहे.
मार्केटमधील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहने उचलून नेण्याची (टोईंग) कारवाई करण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. या सर्व मोहिमेचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा एकदा दुसरी बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.





