इतर

निंबादेवी धरणात बुडालेल्या रामेश्वर कॉलनीतील तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

निंबादेवी धरणात बुडालेल्या रामेश्वर कॉलनीतील तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

यावल प्रतिनिधी l यावल तालुक्यातील सावखेडा सीमजवळील निंबादेवी धरणात रविवारी (दि. २९ जून) सायंकाळी बुडून बेपत्ता झालेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर मंगळवारी (दि. १ जुलै) सापडला. रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील रहिवासी जतीन अतुल वार्डे असे मृत तरुणाचे नाव आहे. तीन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर धरणातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने जतीनसह रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण निंबादेवी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजता घरातून निघालेल्या या तरुणांनी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास धरण गाठले. काही तरुण पाण्यात अंघोळीसाठी उतरले. यावेळी जतीन खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्या मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला,

परंतु कोणालाही पोहता येत नसल्याने ते अयशस्वी ठरले.घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्शद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली.

मात्र, रविवारी रात्री अंधार पडल्याने ती तात्पुरती थांबवावी लागली. मंगळवारी मारुळ आणि लोसनबर्डी येथील कुशल पोहणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबवली गेली. अखेर जतीनचा मृतदेह सापडला. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले.जतीनच्या मृत्यूने रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button