वहीवाटीच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

वहीवाटीच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा
वसंतनगर तांड्यातील घटना; जखमी शेतकऱ्यावर धुळे येथे उपचार सुरू
पारोळा | प्रतिनिधी
तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे शेतातील वहीवाटीच्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल पेलाद जाधव यांची वसंतनगर तांडा शिवारात शेती आहे. दि. ३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ते आपल्या कापूस पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत होते. यावेळी मोटार बंद करण्यासाठी गेले असता तेथे तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव, संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव हे उपस्थित होते.
दरम्यान, शेतातील रस्त्याच्या वहीवाटीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. “तुम्ही आमच्या शेतातून ये-जा करू नका,” असे सांगितल्यानंतर रतिलाल जाधव यांनी हा रस्ता आपल्या शेतीसाठी वापरात असल्याचे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर वाद अधिक चिघळला.
फिर्यादीनुसार, संबंधितांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संदीप तुकाराम जाधव याने कोयत्याने रतिलाल जाधव यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडले.
घटनेच्या वेळी शेतात उपस्थित असलेल्या त्यांचे पुतणे रोहित आत्माराम जाधव यांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रतिलाल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव, संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





