
पैशांवरून वाद पेटला अन् पित्याचा जीव गेला!
आई-मुलाने मिळून केला खून ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
चाळीसगाव : दारूचे व्यसन, घरातील त्रास आणि पैशांवरून झालेल्या वादातून आई आणि तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मिळून पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी घडली. करणसिंह रामसिंग पवार (वय ४५, व्यवसाय मजुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी अरुणाबाई करणसिंग पवार (वय ४२) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पैशांवरून पती-पत्नीमध्ये वाद
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता करणसिंह पवार यांनी पत्नी अरुणाबाई हिच्याकडे गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
मुलाने पंपाने डोक्यात मारल्याचा आरोप
वाद सुरू असताना अल्पवयीन मुलाने वडिलांच्या डोक्यात सायकलची हवा भरण्याच्या पंपाने मारल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर आईने दोरीने करणसिंह यांचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत करणसिंह यांचा मृत्यू झाला.
दारूच्या व्यसनामुळे घरात त्रास?
करणसिंह हे दारूचे व्यसन करत असल्याने घरातील सदस्यांना त्रास होत होता. तसेच त्यांनी परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरूनही कुटुंबात नाराजी असल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
आईसह अल्पवयीन मुलगा ताब्यात
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अरुणाबाई पवार आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. अल्पवयीन असल्याने मुलाची ओळख कायद्यानुसार ‘एबीसी’ अशी ठेवण्यात आली आहे.





