इतर

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

एमआयडीसीतील एल सेक्टरमधील घटना; केमिकल कंपनी शेजारी असल्याने वाढली होती धोक्याची तीव्रता

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव एमआयडीसीतील एल सेक्टर परिसरात असलेल्या लल्लन यादव यांच्या कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन अग्निशमन बंब आणि एका ब्राऊजरसह एकूण तीन वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय गेंदालाल मिल येथील अग्निशमन वाहनानेही मदतकार्यात सहभाग घेतला. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझविली.

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबविण्यात आली. आगीत कुलर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे वाइंडिंग मोटर्स, गवत, लोखंडी पट्ट्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले.

विशेष म्हणजे, संबंधित कंपनीच्या शेजारीच केमिकल कंपनी असल्याने आग अधिक भडकून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. जवानांनी धाडसाने आणि वेगाने केलेल्या कार्यामुळे आग केमिकल कंपनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले.

जवानांचे मोलाचे योगदान

आग विझविण्याच्या मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे, युसुफ पटेल, प्रभाकर पाटील, शोएब तडवी आणि मयूर देसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन ललित पाटील, संजय तायडे, यश मनोरे, वृषभ सुरवाडे, सुमित साळवे, जगदीश साळुंखे, शिवा तायडे, संदीप कोळी, सरदार पाटील, नितीन राठोड, रितेश उबाळे आणि शुभम पाटील यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले.

अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे परिसरातील मोठे नुकसान टळले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनीही जवानांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button