हमालीसाठी सोबत येण्यास सांगितल्याचा राग; मजुराला बेदम मारहाण

हमालीसाठी सोबत येण्यास सांगितल्याचा राग; मजुराला बेदम मारहाण
जळगाव : हमालीच्या कामासाठी सोबत येण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील आर.एल. चौफुली परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीदास परशुराम राठोड (वय ५५, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी हमालीच्या कामासाठी सोबत येण्यास सांगितल्याने संशयित गणेश पवार (रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला राग आला. त्यातून दि. ५ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता आर.एल. चौफुली येथे त्याने राठोड यांना मारहाण केली.
या मारहाणीत रोहीदास राठोड गंभीर जखमी झाले. उपचारानंतर त्यांनी दि. ६ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत जाधव करीत आहेत.




