
बांधकाम मंजुरी २०२१ ची, पण भंगाळे फार्मा अन् मल्टी टच हॉस्पिटलला मालमत्ता कराची आकारणीच नाही!
महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड; ॲड. पियूष पाटील यांची मनपा आयुक्त व तुकाराम मुंढे यांच्याकडे धाव

जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील ओंकार नगर (जिल्हा पेठ) परिसरातील जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील रामदास भंगाळे यांच्या मालकीच्या ‘मल्टी टच हेल्थकेअर हॉस्पिटल’ आणि ‘भंगाळे फार्मा’ या इमारतीची बांधकाम मंजुरी २०२१ मध्ये घेण्यात आली होती. मात्र, तब्बल पाच वर्षे उलटूनही या इमारतीवर मालमत्ता कराची कोणतीही आकारणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी याविरोधात जळगाव मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
पदाचा गैरवापर अन् बांधकामात अनियमितता?
तक्रारीत नमूद केल्यानुसार, पाच वर्षांपूर्वी या इमारतीची नगररचना विभागाकडून मंजुरी घेण्यात आली होती. सुनील भंगाळे हे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर त्यांचे बंधू जळगाव मनपाचे माजी महापौर, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख व विद्यमान नगरसेवक आहेत. राजकीय पदाचा आणि प्रभावाचा दुरुपयोग करून त्यांनी या इमारतीला मालमत्ता कराची आकारणी होऊ दिली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच मनपा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून आणि आर्थिक गैरव्यवहार करून या इमारतीची मंजुरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यात आल्याचेही अर्जात म्हटले आहे.
पार्किंग आणि बेसमेंटच्या जागेत थाटले ‘भंगाळे फार्मा’
इमारतीच्या अधिकृत आराखड्यात पार्किंग व बेसमेंटसाठी दर्शवलेल्या जागेत ‘भंगाळे फार्मा डिस्ट्रीब्यूटर्स’चे भव्य गोडाऊन थाटण्यात आले आहे. पार्किंगच्या जागेचा वापर अशा प्रकारे व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याने भविष्यात आग लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठा अपघात होऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जीवितहानी होऊ शकते, असा गंभीर आक्षेप ॲड. पाटील यांनी घेतला आहे. इमारतीला स्वतंत्र पार्किंग नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. परिणामी, येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. याशिवाय मनपाच्या सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेले जनरेटर तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडेही तक्रार
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत ॲड. पियूष पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे भंगाळे कुटुंब पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
अतिक्रमण हटवून थकबाकी भरावी: ॲड. पियूष पाटील आरोप-प्रत्यारोपाच्या वेळी सर्व कायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्यांनी आधी स्वतःचे अतिक्रमण काढावे, पाच वर्षांपासून बुडवलेला मालमत्ता कर मनपाकडे जमा करावा आणि सामान्य जनतेची गैरसोय थांबवून आपली नैतिकता दाखवून द्यावी, असा घणाघाती टोला ॲड. पियूष पाटील यांनी लगावला आहे.
आता मनपा आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी संबंधित असलेल्या या हायप्रोफाइल प्रकरणात जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त काय कारवाई करतात आणि अनधिकृत वापरावर काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.




