SP श्रीकांत धिवरे थेट रस्तावर उतरले ;जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद

SP श्रीकांत धिवरे थेट रस्तावर उतरले ;जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कट्ट्यावर रविवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. पोलीस अधीक्षकांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक तसेच परिसरातील रहिवाशांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. या अनोख्या संवाद उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळच्या वेळेत काव्यरत्नावली चौकातील कट्ट्यावर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात. याच ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या वाहतूक समस्या, अपघात, रात्रीची गस्त, महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांचे मत जाणून घेतले. अनेकांनी काही भागांमध्ये वाढलेल्या वाहतुकीच्या समस्या, बेदरकार वाहनचालक, तरुणांकडून होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या काही गैरप्रकारांकडे लक्ष वेधले.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले. पोलिसांशी संबंधित कोणतीही तक्रार, अडचण किंवा गैरवर्तनाचा अनुभव आल्यास नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. “पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय प्रभावी पोलिसिंग शक्य नाही,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.





