पोहण्यासाठी गेलेले दोन शालेय विद्यार्थी तापी नदीत बुडाले!

पोहण्यासाठी गेलेले दोन शालेय विद्यार्थी तापी नदीत बुडाले!
एकाचा मृत्यू तर दुसऱ्याचा शोध सुरू
अमळनेर, l प्रतिनिधी तापी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील निम येथे दोन जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यात एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलाचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला होता.
यामध्ये इयत्ता तिसरीतील चेतन अरुण सुतार (वय १०) या मुलाचा मृतदेह सापडला असून, इयत्ता सातवीतील हरीश बाळू पाटील (वय १२) याचा शोध अजून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे.
दोन्ही मुले पोहण्यासाठी तापी नदीवर गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. चेतन सुतार याचा मृतदेह काही वेळात सापडला असून, त्याची वैद्यकीय तपासणी डॉ. जी. एम. पाटील यांनी करून मृत घोषित केले. चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे, हरीश पाटील याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
शोधकार्य तलाठी जितेंद्र जोगी यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यांनी स्थानिक नाविकांच्या मदतीने पोहणाऱ्या नागरिकांकडून नदीत शोध घेतला. घटनास्थळी मारवड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. जिभाऊ पाटील, सहायक फौजदार फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांच्यासह पथकाने भेट देत पंचनामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सुतार याची आई चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील माहेरी गेली होती, घरी केवळ वृद्ध आजी-आजोबा होते. तर हरीश पाटील यांच्या वडिलांची गावात पानटपरी आहे. त्या दिवशी गावात लग्न असल्यामुळे पानटपरी सुरू होती. हीच संधी साधून दोघे मित्र पोहायला गेले. त्यांच्या इतर तिघा मित्रांनी त्या दिवशी पोहायला जाणे टाळले आणि त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गुर्जर आणि सुतार समाजातील घरांमध्ये चुला पेटलेली नाही. दोन्ही समाजातील शेकडो नागरिक रात्री उशिरापर्यंत तापी नदीकाठी थांबून शोधकार्य पाहत होते.