जनता बँकेचा दमदार आर्थिक झेंडा; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
व्यवसायात २७६ कोटींची भरारी, ठेवी २,४३६ कोटींवर; डिजिटल बँकिंग आणि ग्रामीण विकासावर विशेष भर

जनता बँकेचा दमदार आर्थिक झेंडा; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
व्यवसायात २७६ कोटींची भरारी, ठेवी २,४३६ कोटींवर; डिजिटल बँकिंग आणि ग्रामीण विकासावर विशेष भर
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजी राजे नाट्य संकुल येथे झालेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी ही घोषणा करताना बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. मागील आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण व्यवसायात तब्बल २७५.९६ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ठेवी आणि कर्जवाटपात लक्षणीय वाढ
३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींमध्ये १८५.३८ कोटी रुपयांची वाढ होऊन त्या २,४३६.२८ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच कर्जवाटपात ९०.५८ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून एकूण कर्जरक्कम १,४४९.३९ कोटी रुपयांवर गेली आहे. ठेवी आणि कर्जवाटपातील वाढीमुळे बँकेने आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत केल्याचे दिसून आले.
नेट एनपीए शून्यावर; आर्थिक शिस्तीचे उदाहरण
बँकेने आर्थिक शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण घालत ग्रॉस एनपीए केवळ ३.३५ टक्क्यांवर राखला आहे. विशेष म्हणजे नेट एनपीए शून्य टक्क्यांवर आणण्यात बँकेला यश आले असून ही बँकेच्या व्यवस्थापनाची मोठी उपलब्धी मानली जात आहे.
डिजिटल व्यवहारांकडे ग्राहकांचा वाढता कल
उपाध्यक्ष नितीन झवर यांनी सादरीकरणाद्वारे बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. इंटरनेट बँकिंगसह आधुनिक डिजिटल सेवांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन आणि सातत्याने मिळणारा ‘अ’ वर्ग हा बँकेच्या विश्वासार्हतेचा पुरावा असल्याचेही नमूद करण्यात आले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ३,६०० बचतगट
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या बचतगट विभागामार्फत सध्या ३,६०० बचतगटांतील सुमारे ६० हजार महिलांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचत आहेत. तसेच ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘दुग्धसंपदा’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
लहान मुलांमध्ये बचतीची सवय रुजावी यासाठी ‘बालमित्र बचत खाते’ योजना सुरू करण्यात आली असून खाते उघडणाऱ्या मुलांना आकर्षक पिगी बँक दिली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दोन अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन बँकेने केले आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल साक्षरता अभियानही राबविण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या सुरक्षित बँकिंग व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल
सभेत बोलताना अध्यक्ष सतीश मदाने यांनी सभासदांना जास्तीत जास्त व्यवहार बँकेमार्फत करण्याचे आवाहन केले. भविष्यात इतर राज्यांत शाखाविस्तार करण्याचे नियोजन असून बँक आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेतील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले, तर सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.





