
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची विजयी सलामी!
पारोळा, एरंडोल, भुसावळच्या जागा बिनविरोध; तीन दिग्गज नेत्यांच्या पत्नींची संचालकपदी निवड

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील जागा बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही जागांवर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या पत्नींची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यामध्ये शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे.
पाटील कुटुंबातील दोन महिलांची बाजी
पारोळा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच एरंडोल सोसायटी मतदारसंघातून आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील यांनीही बिनविरोध बाजी मारली आहे. एकाच राजकीय घराण्यातील दोन महिलांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाल्याने या निवडीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सावकारे कुटुंबाचेही बँकेत प्रतिनिधित्व
भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सावकारे कुटुंबाचे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.
उर्वरित जागांवरील लढतींकडे लक्ष
तीन जागांवरील बिनविरोध निवडीमुळे महायुतीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी सलामी दिली आहे. प्रभावशाली राजकीय कुटुंबांतील महिलांना मिळालेली संधी आणि तीन जागांवरील बिनविरोध यश यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
आता उर्वरित मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, कोण माघार घेतात आणि कुठे थेट लढती होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी घडामोडींनंतर जिल्हा बँकेतील सत्तेचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.




