टीव्ही संच डोक्यावर पडल्याने १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

टीव्ही संच डोक्यावर पडल्याने १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
आमोदा गावातील घटना; परिसरात हळहळ
फैजपूर | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आमोदा येथे घरातील टीव्ही संच डोक्यावर पडल्याने १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेमुळे आमोदा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजमीन मोहम्मद इसाक पिंजारी (वय १३, रा. आमोदा) ही रविवारी पहाटे घरात असताना घरातील रिकाम्या कोठीवर ठेवलेला टीव्ही संच अचानक तिच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.
उपचारादरम्यान मृत्यू
घटनेनंतर कुटुंबीयांनी नाजमीन हिला तातडीने भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आली असून यावल तहसीलदार मोहनमाला नाझरीकर यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
या प्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसाक पिंजारी यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेहनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहेत




