जळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस नूतनीकृत तिकीट खिडकी सुरू


जळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस नूतनीकृत तिकीट खिडकी सुरू
शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा; अनारक्षित तिकिटांची सुविधा, दोन पाळ्यांत होणार संचालन
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला, शिवाजीनगरच्या बाजूस प्रवाशांच्या सोयीसाठी नूतनीकृत रेल्वे तिकीट खिडकी गुरुवारपासून सुरू करण्यात आली. या सुविधेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर व परिसरातील प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्याची गरज भासणार नसल्याने त्यांचा वेळ वाचणार असून गैरसोयही कमी होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, वरिष्ठ शाखा अधिकारी, स्थानक व्यवस्थापक, रेल्वे कर्मचारी, प्रवासी व नागरिक उपस्थित होते. स्थानकाच्या उत्तर बाजूस तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी परिसरातील प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शिवाजीनगरच्या बाजूस सुरू करण्यात आलेल्या या खिडकीवर केवळ अनारक्षित रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवासासाठी अनारक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना मुख्य तिकीट खिडकीकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. उत्तर बाजूने स्थानकात प्रवेश करून तिकीट घेणे नागरिकांसाठी अधिक सोयीचे होणार आहे.
जळगाव शहराचा विस्तार वाढत असून रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. विद्यार्थी, नोकरदार तसेच इतर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी स्थानकाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस जावे लागत होते. विशेषतः शिवाजीनगर परिसरातील नागरिकांसाठी ही बाब वेळखाऊ ठरत होती. नूतनीकृत तिकीट खिडकीमुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दोन पाळ्यांत तिकीट सेवा
नवीन तिकीट खिडकीचे संचालन दररोज दोन पाळ्यांमध्ये करण्यात येणार आहे. पहिली पाळी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर दुसरी पाळी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे सकाळी तसेच दुपारनंतर व रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी सेवा देण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. स्थानकावरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन सेवा अधिक सुलभ करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे.




