

टायर फुटला अन् टेम्पो उलटला; दोन हमालांचा दुर्दैवी मृत्यू
शेंदुर्णी-पहूर मार्गावरील घटना; पोषण आहार वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
जळगाव : शालेय पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास करणाऱ्या दोन हमालांचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावर मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. टेम्पोचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ४०७ टेम्पो रस्त्यावर उलटला. यावेळी गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल वाहनाबाहेर फेकले गेले.
जगदीश लालचंद पाटील (कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (बहिरम नगर, पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत.
पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या घेऊन हा टेम्पो पुढील वितरणासाठी निघाला होता. दोन्ही हमाल गोण्यांवर बसून प्रवास करत होते. टायर फुटल्यानंतर वाहन उलटले आणि दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे पोषण आहाराच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवाहू वाहनात कामगारांना बसवून नेण्यास परवानगी होती का, वाहनाचा फिटनेस, परमिट व विमा वैध होते का, तसेच वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पहूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. वाहनाची तांत्रिक स्थिती, टायरची अवस्था आणि अपघाताची नेमकी कारणे तपासली जात आहेत. नियमभंग किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.




