

जिल्ह्यातील २५० अंगणवाड्यांचा ‘स्मार्ट’ कायापालट
अत्याधुनिक किटमुळे शिक्षण, आरोग्य व पोषण सुविधांना नवे रूप; तीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांसाठी पुढील टप्प्याची तयारी
जळगाव : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा दर्जा उंचावून त्यांचे रूपांतर ‘आदर्श अंगणवाडी केंद्रां’मध्ये करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे २५० अंगणवाड्यांना अत्याधुनिक ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रांचा कायापालट झाला असून बालकांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षातील पुढील टप्प्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने मागविलेली माहिती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून सादर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या तीन हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे आगामी टप्प्यात आणखी किती अंगणवाड्यांचा समावेश होतो, याकडे लक्ष लागले आहे.
स्मार्ट किटमध्ये डिजिटल साहित्य
बालकांची संख्या लक्षात घेऊन ‘स्मार्ट-१ अंगणवाडी किट’ची किंमत सुमारे ६० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. या किटमध्ये अध्यापनासाठी एलईडी टीव्ही किंवा टॅब्लेट, पायाभूत अक्षरओळख व अंकज्ञानासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तसेच बालकांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला पूरक रंगीबेरंगी खेळण्यांचा समावेश आहे.
डिजिटल साधनांतून आरोग्य-पोषणाचा मागोवा
बालकांची वाढ, आरोग्य आणि पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. आधुनिक सुविधांमुळे बालकांचे पूर्व-प्राथमिक शिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी होण्यास मदत होत आहे. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून परिसरातील गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्यसेवा आणि पोषणविषयक मार्गदर्शन मिळणे सुलभ झाले आहे.
पहिल्या टप्प्यात निवडलेल्या २५० अंगणवाड्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी आवश्यक आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक अंगणवाड्यांना आधुनिक स्वरूप प्राप्त होत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.




