

पवित्र पोर्टलअंतर्गत २१४ शिक्षकांना पदस्थापना
जळगाव : पवित्र पोर्टल पदभरती २०२५ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे मंगळवारी (दि. १५) २१४ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे १६३, तर उर्दू माध्यमाच्या ५१ शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली पदस्थापनेची प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यातील विविध शाळांमधील उपलब्ध रिक्त जागा, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तसेच शासनाच्या निर्धारित नियमांचा विचार करून पदस्थापना प्रक्रिया राबविण्यात आली. समुपदेशनाच्या वेळी उमेदवारांना उपलब्ध रिक्त पदांची माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या पसंतीनुसार नियमानुसार नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली.
सीईओंसमोर उमेदवाराचा आग्रह
समुपदेशनाच्या बैठकीदरम्यान एका शिक्षक उमेदवाराने आपल्या पसंतीच्या गावातच नियुक्ती देण्याचा आग्रह धरला. यावरून संबंधित उमेदवार आणि सीईओ करिश्मा नायर यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला. नियुक्ती ही शासनाच्या नियमांनुसारच केली जाईल आणि उमेदवाराने मागणी केलेल्या ठिकाणीच पदस्थापना देणे शक्य नसल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित उमेदवाराला सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पदस्थापनेची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्यात आली.
या कार्यवाहीस शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे तसेच आस्थापना विभागातील लिपिक वर्गाने सहकार्य केले.




