इतरखान्देशजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीयसामाजिक

उष्मघाताने मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाखांची मदत

आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना’त उष्मघाताचा समावेश

उष्मघाताने मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाखांची मदत

आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना’त उष्मघाताचा समावेश

जळगाव : वाढत्या तापमानामुळे उष्मघाताने होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांची दखल घेत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुधारित स्वरूपात लागू केली असून, या योजनेत उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उष्मघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना आता दोन लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

राज्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला होता. विशेषतः जळगाव जिल्ह्यासह खान्देशात तीव्र उष्णतेमुळे उष्मघाताच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार खडसे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करून उष्मघाताचा आपत्तीच्या श्रेणीत समावेश करून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

उन्हाळ्यात दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा मार्गदर्शक सूचना शासनाला जारी कराव्या लागतात. त्यामुळे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या गरिबांच्या कुटुंबांना केवळ तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भूमिका खडसे यांनी मांडली होती.

या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या कृषी विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार शेती व्यवसाय करताना किंवा उघड्यावर काम करताना उष्मघातामुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली असून, पूर्वी केवळ ७/१२ उताऱ्यावर नाव असलेल्या खातेदार शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीपुरता मर्यादित असलेला लाभ आता भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी, वहितीधारक खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व कायदेशीर सदस्यांपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यासही दोन लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उष्मघाताचा योजनेत समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button