वाघूर नदीत बैलांना पाणी पाजताना वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह २४ तासांनंतर हस्तगत; बचाव पथकाच्या कामगिरीचे कौतुक

वाघूर नदीत बैलांना पाणी पाजताना वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह २४ तासांनंतर हस्तगत; बचाव पथकाच्या कामगिरीचे कौतुक
विशेष प्रतिनिधी | जळगाव
कळगाव (ता. जळगाव) येथील ६० वर्षीय अरुण माधव कोळी यांचा वाघूर नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत पडले होते. सलग २४ तास राबवलेल्या शोधमोहीमेनंतर मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाच्या रबर बोट पथकाला त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
पाण्याखालील झाडीत अडकला होता मृतदेह
घटनेची माहिती ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ व मनपा अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू झाले. मंगळवारी सकाळी रबर बोटीसह शोध घेताना अरुण कोळी यांचा मृतदेह नदीच्या तळाशी असलेल्या झाडाझुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. दाट झाडीमुळे मृतदेह बाहेर काढताना पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या ८ कर्मचाऱ्यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
अत्यंत खडतर परिस्थितीत राबवलेल्या या बचावकार्यात अग्निशमन दलाच्या आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये:
प्रकाश चव्हाण (टीम प्रमुख)
देविदास सुरवाडे
प्रदीप धनगर
सौरभ चिकटे
योगेश पाटील
किरण महाजन
महेंद्र कोळी
विकास सोनवणे (बांभोरी)
या सर्वांनी शोधमोहीमेत मोलाचे सहकार्य केले.

ग्रामस्थांकडून टीमचे कौतुक
शोधकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अरुण कोळी यांचा मृतदेह गावाचे तलाठी, पोलीस पाटील आणि उपस्थित ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. तब्बल २४ तास सलग परिश्रम घेऊन शोधमोहीम फत्ते करणाऱ्या अग्निशमन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि बचाव पथकाचे कळगाव ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.



