ठिय्या आंदोलनाचा अखेर परिणाम; वीज वितरण कंपनीने घेतली माघार

ठिय्या आंदोलनाचा अखेर परिणाम; वीज वितरण कंपनीने घेतली माघार
शेतकऱ्यांना पूर्ववत सलग ८ तास वीजपुरवठ्याचे लेखी आश्वासन; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आंदोलनाला यश
जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर अखेर वीज वितरण कंपनीला माघार घ्यावी लागली असून, सलग आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला यश मिळाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज करण्यात आलेल्या आंदोलनानंतर जळगाव ग्रामीण, चाळीसगावसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ववत सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले.
शेतकऱ्यांना विना खंडित किमान १० तास वीजपुरवठा मिळावा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि पिकांचे होणारे नुकसान थांबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख यांनी विद्युत कायदा २००३ मधील कलम ४३ आणि ५७ चा उल्लेख करत सुरळीत वीजपुरवठा हा शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने केळी, भाजीपाला आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या गुणवत्ता मानकांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास CGRF, विद्युत लोकपाल आणि ग्राहक मंचात भरपाईसाठी दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनानंतर अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांना पूर्ववत सलग ८ तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडून लेखी पत्रही देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख , महिला जिल्हाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, रिंकू चौधरी, संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, डॉ. रमाकांत कदम, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.





