

पुन्हा लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
७०० रुपयांची मागणी; २०० रुपये स्वीकारताच रंगेहात कारवाई; २०१२ मध्येही गुन्हा
जळगाव : शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची लाच मागणाऱ्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकास तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
भगवान रोहिदास गायकवाड (५१, रा. भुसावळ) असे कारवाई झालेल्या भूकरमापकाचे नाव आहे. नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी २ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. त्यावेळी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी गायकवाड यांनी ७०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले.
ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून २०० रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने गायकवाड यांच्यावर झडप घातली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, जामनेर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विशेष म्हणजे गायकवाड यांच्याविरुद्ध २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सुमारे १४ वर्षांनी ते पुन्हा एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
या सापळा कारवाईत पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहिले. हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला




