खान्देशगुन्हेजळगांव

इंजेक्शन देतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरचा तरुणीवर चार महिने अत्याचार

इंजेक्शन देतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरचा तरुणीवर चार महिने अत्याचार

एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी : उपचारासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणीशी जवळीक वाढवून तिला इंजेक्शन देतानाचा व्हिडिओ असल्याचे सांगत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर या धमकीच्या माध्यमातून तरुणीवर सुमारे चार महिने वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात डॉक्टर ताबिश रजा सय्यद अली अंजुम (२८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणी शिक्षण घेत असून ती या परिसरात आई-वडील व भावांसह राहते. १७ एप्रिल २०२५ रोजी प्रकृती बिघडल्याने ती उपचारासाठी परिसरातील डॉक्टर ताबिश रजा याच्याकडे गेली होती. तेव्हापासून डॉक्टरशी तिची ओळख झाली. उपचारानंतर डॉक्टरने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि हॉस्पिटलच्या ग्रुपमध्ये जोडण्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये फोन आणि मेसेजद्वारे संपर्क सुरू झाला.

काही दिवसांनी डॉक्टरने तिच्याशी अधिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. उपचारादरम्यान इंजेक्शन देतानाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या धमकीचा वापर करून तरुणीला दबावाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरने तिला आपल्या कारमधून मेहरुण तलाव परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्येही तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले. आठवड्यातून एक-दोन वेळा हा प्रकार सुरू होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे चार महिने तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच संबंध ठेवण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

काही काळानंतर दोघांमधील संपर्क बंद झाला. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये डॉक्टरने पुन्हा फोन करून भेटण्यास सांगितले. यावेळी तरुणीने यापूर्वी घडलेला प्रकार डॉक्टरच्या आई-वडिलांना सांगितला. मात्र, त्यांच्याकडूनही तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, डॉक्टरचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांत गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली जात असल्याने आतापर्यंत तक्रार करता आली नसल्याचे तिने नमूद केले.

अखेर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.४७ वाजता गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक राजश्री दिलीप पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button