
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी
बांधकामाचा दर्जा व प्रस्तावित सुविधांबाबत आवश्यक सूचना

जळगाव, दि. ६ ऑक्टोबर २०२६ :
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी एरंडोल येथे भेट देऊन निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी कार्यालयाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाचा दर्जा, कामाची सद्यस्थिती तसेच कार्यालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती घेतली. बांधकामाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार राखण्याबाबत तसेच आवश्यक सुविधांचा योग्य पद्धतीने समावेश करण्याबाबत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वाचे असल्याने कार्यालयीन सुविधा, आवश्यक पायाभूत सोयी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामाची गुणवत्ता व नियोजनाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी दिल्या.
यावेळी एरंडोल येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.




