
जळगाव शहरात विजेचा ताण कमी करण्यासाठी हालचालींना वेग; महापौरांचा पुढाकार
५ नवीन सबस्टेशन उभारणीसाठी लवकरच अंतिम निर्णय; महावितरण व मनपाच्या संयुक्त पाहणीचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील वाढत्या विजेच्या ओव्हरलोडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (दि. ४ मे २०२६) महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत शहरातील पाच नवीन सबस्टेशन उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित असलेल्या या कामांना आता लवकरच गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
समन्वया अभावी कामे रखडली
महावितरण विभागाकडून यापूर्वीच काही सबस्टेशनचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते आणि त्यांना मंजुरीही मिळाली होती. मात्र, मागील प्रशासकीय कार्यकाळात या प्रस्तावांची अंमलबजावणी झाली नसल्याने उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या लपंडावाला आणि ओव्हरलोडच्या तक्रारींना सामोरे जावे लागत होते. महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही कामे प्रलंबित राहिल्याचे बैठकीत समोर आले.
अधिकारी करणार संयुक्त पाहणी
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत महापौरांनी सबस्टेशन उभारणीसाठी पर्यायी जागांची यादी महापालिकेकडून सादर केली आहे. या जागांची प्रत्यक्ष तांत्रिक पाहणी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्त दौरा करणार आहेत. या पाहणीनंतर तातडीने अंतिम निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे.
बैठकीला अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अधिकारी अजय वाणी, देवेंद्र भंगाळे, चेतन सोनार तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे संदीप मोरे उपस्थित होते
शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. ही पाच नवीन सबस्टेशन उभारल्यास शहरातील विजेचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
”नागरिकांच्या विजेच्या तक्रारी सोडविणे ही आमची प्राथमिकता आहे. महावितरण आणि मनपाच्या समन्वयातून नवीन सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लावून तातडीने अंमलबजावणी केली जाईल.”
— दीपमाला काळे (महापौर, जळगाव)





