
ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणारा सराईत चोरटा गजाआड
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत यावलमधून अटक
जळगाव प्रतिनिधी शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वाहनचालक व ट्रान्सपोर्ट मालक यामुळे त्रस्त होते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद केले.
सूत्रांच्या माहिती नुसार १६ मार्च रोजी फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी त्यांचे दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. दोन्ही ट्रकच्या टाकीत १०० लिटर डीझेल भरलेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल गायब असल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याची खात्री पटताच तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान, पोलिसांना समजले की, परिसरात यापूर्वीही वाहनांमधून इंधन चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र, किरकोळ नुकसान झाल्याने अनेक वाहनचालकांनी तक्रार दाखल केली नव्हती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये संशयित आरोपी मोटारसायकलवर येत ट्रकच्या टाकीचे झाकण उघडून नळीच्या सहाय्याने डीझेल काढत असल्याचे स्पष्ट दिसले.
यावल तालुक्यातून संशयित ताब्यात
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर (वय २५) याला अटक केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० लिटर डीझेल हस्तगत केले आहे.
या कारवाईमुळे वाहनचालक व ट्रान्सपोर्ट मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे चिंतेत असलेल्या वाहनचालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.