
जळगाव प्रतिनिधी शहराजवळील ममुराबाद रोडवरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी रविवारी (दि. २८ सप्टेंबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत परदेशी नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या या छाप्यात कॉल सेंटरचा हायटेक सेट-अप जप्त करण्यात आला असून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या जागेचे मालक व माजी महापौर ललित कोल्हे यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,शनिवारी (दि. २७) पोलिसांना या कॉल सेंटरविषयी गुप्त माहिती मिळाल्यानंतर तत्काळ एलसीबी, शनिपेठ, तालुका पोलीस स्टेशन यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर रविवारी दुपारी छापा टाकण्यात आला असता, ३१ लॅपटॉपसह मोठ्या प्रमाणात साहित्य व उपकरणे जप्त झाली. प्राथमिक चौकशीत उघडकीस आले की, येथील कर्मचारी स्वतःला “अधिकृत एजंट” असल्याचे भासवत विविध प्रकारच्या आमिषांचे आमंत्रण देऊन परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत होते. डेटा तपासणी व आकर्षक योजनांच्या नावाखाली गंडा घालण्याचा त्यांचा डाव असल्याचे निष्पन्न झाले.
या छाप्यात पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांमध्ये माजी महापौर ललित कोल्हे, नरेंद्र आगरिया , राकेश आगरिया, चंदू आगरिया, नंदू आगरिया, स्वयंपाकी अली, तसेच कोलकाता येथून आलेले शाबाज आलम, जिशान नूरी, हाशीर रशीद या आठ जणांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी माहिती देताना सांगितली की, विदेशी नागरिकांची वेगवेगळ्या कंपनीची एजंट असल्याचे भासवून फसवणूक होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. याची खातर जमा केली असता प्रथमदर्शनी हे बोगस कॉल सेंटर असल्याचे आढळून आले. त्यानुसार आज रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांच्या विविध पथकाने छापा टाकून पाहणी केले असता 31 लॅपटॉप आढळून आले. तसेच या ठिकाणी कॉल सेंटरचे लूक दिले असल्याचे दिसून आले. यातील मुंबई येथून हे कॉल सेंटर हाताळणारे अकबर, अली आणि इमरान नावाच्या तीन जणांची नावे चौकशीतून समोर आली आहेत अशी माहिती नखाते यांनी दिली.





