
लिपिकाविरोधात तक्रार केल्याचा राग; RTO प्रतिनिधीला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून, RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने एका प्रतिनिधीला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुलतानबेग नजीरबेग मिर्झा (वय ५३, व्यवसाय – RTO प्रतिनिधी, रा. प्लॉट नं. ४, गट नं. ४१६, AB कॉलनी, ऊसमानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता जळगाव येथील RTO कार्यालयात ही घटना घडली.
फिर्यादीने RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिक चंद्रशेखर इंगळे (रा. महावीर नगर, दूध फेडरेशनजवळ, शिवाजी नगर) याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून शेखर इगळे यांनी सुलतान मिर्झा यांना कार्यालयात शिवीगाळ करत, “तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटकवतो,” अशी धमकी दिली. या घटनेच्या वेळी अनिल रतन शिंदे (रा. शिंदे मगर, पिंप्राळा, जळगाव) हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.
या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत समज देण्यात आली आहे.