खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

जळगाव जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत आज; ‘जुने चेहरे’ की ‘नव्या चेहऱ्यांना संधी?

जळगाव जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत आज; ‘जुने चेहरे’ की ‘नव्या चेहऱ्यांना संधी?

राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष; इच्छुकांच्या गणितांची आज परीक्षा

जळगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज, सोमवार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत जाहीर होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेतून आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता असल्याने विद्यमान सदस्य, माजी पदाधिकारी आणि नव्या इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

६८ गट आणि १३६ गणांचे भविष्य आज ठरणार
जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. तर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या १३६ गणांचे आरक्षण तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर निश्चित केले जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांसाठी जागांचे वाटप ठरणार असून कोणाचा गट राखीव ठरणार आणि कोणाचा गट खुला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाव्य आरक्षणाचे चित्र
नवीन नियमावलीनुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे —

अनुसूचित जाती (SC): ६

अनुसूचित जमाती (ST): १३

इतर मागास प्रवर्ग (OBC): १८

सर्वसाधारण: ३१
एकूण ६८ गटांपैकी ३४ गटांवर महिला उमेदवारांसाठी आरक्षण अपेक्षित आहे.

राजकीय समीकरणांची कसोटी
गेल्या काही दिवसांपासून अनेक इच्छुकांनी आपल्या गटांवरील संभाव्य आरक्षणाचे आडाखे बांधले होते. जुन्या आरक्षण पद्धतीतून गट राखीव झाल्याने मागील निवडणुकीत अपात्र ठरलेले अनेक माजी सदस्य या वेळी पुन्हा रिंगणात उतरण्याची आशा बाळगून होते. आजची सोडत त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जि.प. अध्यक्षपद आधीच ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आधीच सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे आता गट आणि गणांच्या आरक्षणानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे. दिवाळीनंतर जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीच्या तारखांकडेही उत्सुकता
राज्य निवडणूक आयोग ग्रामीण (जि.प./प.स.) आणि नागरी (नगरपालिका/नगरपंचायत) निवडणुका कोणत्या क्रमाने घ्याव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मते मागवत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

हरकतींसाठी मुदत उद्यापासून
आरक्षणाची आजची सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती नोंदविण्यासाठी १४ ते १७ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आहे. या हरकतींवर सुनावणी करून २७ ऑक्टोबर रोजी गोषवारा सादर होईल. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी प्रारूप आरक्षण निश्चित करण्यात येईल, आणि ३ नोव्हेंबर रोजी राजपत्र प्रसिद्ध होऊन आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button