
मुंबईतील तिघे मोटार वाहन निरीक्षक अखेर निलंबित; तेरा महिन्यांनंतर कारवाईचा दणका
जळगाव | प्रतिनिधी
मुंबईत कार्यरत असलेल्या तिघा मोटार वाहन निरीक्षकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी अखेर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. धनराज शिंदे, संतोष काथार आणि परिक्षीत पाटील या तिघा अधिकाऱ्यांना १४ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तेरा महिन्यांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल
४ सप्टेंबर २०२४ रोजी या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील इतक्या कालावधीनंतरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने “परिवहन विभागाला उशिरा सुचलेले शहाणपण” अशा शब्दांत या निर्णयावर चर्चा रंगली आहे.
निलंबन काळातील अटी आणि मुख्यालय निश्चित
परिवहन आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार,
धनराज शिंदे व संतोष काथार यांचे मुख्यालय भडगाव उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय,
तर परिक्षीत पाटील यांचे मुख्यालय चाळीसगाव उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय निश्चित करण्यात आले आहे.
निलंबन काळात संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या मुख्यालयाच्या हद्दीबाहेर जाण्यासाठी संबंधित उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच या काळात त्यांनी कोणतीही नोकरी स्वीकारू नये वा व्यापारात सहभाग घेऊ नये, असेही आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
उशिराने घेतलेला निर्णय चर्चेत
भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणपणे तात्काळ निलंबन होते, परंतु या प्रकरणात तब्बल तेरा महिन्यांनी कारवाई झाल्याने परिवहन खात्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्याने रुजू झालेल्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून या तिघांना पुढे कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या उशिराच्या निलंबनामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही यामुळे खळबळ माजली आहे.




