
समाजवादी पार्टीकडून आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी
जळगाव प्रतिनिधी अहमदनगर (अहिल्यानगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव समाजवादी पार्टीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात आमदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीच्या निवेदनानुसार, आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूंना केवळ हिंदू विक्रेत्यांकडून दिवाळीची खरेदी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. हे वक्तव्य भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असून, दोन समुदायांमध्ये धार्मिक आधारावर तेढ निर्माण करणारे आहे. अशा वक्तव्यांमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते तसेच आर्थिक बहिष्काराची परिस्थिती उद्भवते. दिवाळी हा सण आनंद, बंधुभाव आणि शांतीचे प्रतीक आहे, परंतु जगताप यांनी या धार्मिक सणाचा वापर घृणास्पद राजकारणासाठी केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे.
जगताप यांचे हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम ११३बी, ११५, १४७, १५० तसेच Representation of the People Act 1951 च्या कलम ८ अंतर्गत दंडनीय अपराध ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समाजवादी पार्टीच्या मागण्या: १. आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. २. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करावा. ३. धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस करावी.
आंदोलनाचा इशारा: प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास समाजवादी पार्टी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर जळगाव समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष रिझवान जहागीरदार यांची स्वाक्षरी आहे. त्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहील.





