
पाचोऱ्यात बँकेतून काढलेली दोन लाखांची रोकड लुटली; अल्पवयीन मुलासह तिघे संशयित
नुराणी नगरात चोरट्यांनी रचलेल्या कटातून फिल्मी स्टाईल चोरी
पाचोरा, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील नुराणी नगर परिसरात जे.डी.सी.सी. बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात तिघांचा सहभाग असून, त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगाही सामील असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी शाळेसाठी संगणक खरेदी आणि बांधकामासाठी लागणारा निधी म्हणून जे.डी.सी.सी. बँकेतून दोन लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक शेख खलील शेख नुरा यांच्याकडे सोपवली. शेख नुरा यांनी ही रक्कम आपल्या मोपेडच्या डिक्कीत ठेवून घराकडे निघाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मोपेड कम्पाऊंडमध्ये उभी केली. याचवेळी रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाने फिट आल्याचे नाटक केले. शेख नुरा त्याला मदत करण्यासाठी धावले, तेव्हा दोन चोरटे मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी शेख नुरा यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले. या गोंधळाचा फायदा घेत चोरट्यांनी मोपेडच्या डिक्कीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरली. मोपेडची चावी तशीच राहिल्याने त्यांना ही संधी मिळाली. चोरी करून तिघेही, अल्पवयीन मुलासह, पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शेख नुरा यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तिघे संशयित कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि दोन अन्य व्यक्तींचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन देशमुख यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा अभ्यास सुरू आहे.





