
नशिराबादजवळ कुंटणखान्यावर धाड; ५ तरुणींची सुटका, दोघांना अटक
जळगाव प्रतिनिधी महामार्गालगत, टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारात एका सिमेंटच्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पाच पीडित तरुणींची सुटका केली असून, या अड्ड्याचे संचालन करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काही महिला आणि तरुणींना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गंभीर माहितीच्या आधारे नशिराबाद पोलिसांनी तत्काळ मानवी तस्करी विरोधी पथकाच्या (AHTU) मदतीने संयुक्तपणे छापा टाकला. छापा टाकल्यानंतर घरातून पाच तरुणी आढळल्या, तसेच दोन चालक आणि दोन मुख्य संशयित घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी राहुल पाटील (रा. जळगाव) आणि राम बोरसे (रा. जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याव्यतिरिक्त, चेतन माळी आणि श्याम बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान ₹६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे आणि AHTU पथकासह सहाय्यक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख आणि ज्ञानेश्वर पवार या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.




