
जळगावात वक्फ कायदा सुधारणांविरोधात ३ नोव्हेंबरला व्यापार बंद, जनजागृती मोहीम सुरू
जळगाव : वक्फ कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी मुस्लीम समाजाचे असंतोष कायम आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने देशभरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मुस्लीम समाज बांधवांकडून व्यापार-उद्योग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी (दि. २० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. बिगर मुस्लिम बांधवांशी चर्चा, धरणे, रॅली आदी मार्गांनी आंदोलन दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) शहरातील सर्व ६० मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करून वक्फ सुधारणा कायदा रद्द व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
जळगावातील वक्फ कोऑर्डिनेशन समिती या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून, पत्रकार परिषदेस मुफ्त्ती हारून नदवी, करीम सालार, सुहैल अमीर, अयाज अली व डॉ. रागीब जहागीरदार आदी उपस्थित होते.




