
पैसे न दिल्याच्या रागातून पाणीपुरीवाल्यावर चॉपरने हल्ला
जळगाव प्रतिनिधी शहरातील महाबळ रोड परिसरात पैसे न दिल्याच्या रागातून एका पाणीपुरी विक्रेत्यावर चॉपरने वार करण्याची धक्कादायक घटना घडली. देविदास गोवर्धन चितळे (वय ५४, रा. वाघनगर) असे जखमी विक्रेत्याचे नाव असून, रामानंदनगर पोलिस ठाण्यात गणेश सोनवणे (रा. समता नगर, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री मायादेवी मंदिरासमोर घडली. आरोपी गणेश सोनवणे याने काही दिवसांपूर्वी देविदास चितळे यांच्याकडून पैसे घेतले होते. ते परत न दिल्याने वाद निर्माण झाला. रात्री पुन्हा भेट झाल्यावर पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात गणेशने जवळच ठेवलेल्या चॉपरने चितळे यांच्यावर वार केला.
नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून जखमीला रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





