रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये बालकाला अमानुष मारहाण; परिसरात संतापाची लाट

रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये बालकाला अमानुष मारहाण; परिसरात संतापाची लाट
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये बुधवारी (२३ जुलै) दुपारी घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुकटपुरा, पंचशील नगर भागातील १२ वर्षीय समीर जाकीर काकर या चिमुरड्याला क्रिकेट खेळताना चेंडू दुकानाच्या आत गेला म्हणून एका कर्मचाऱ्याने अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
समीर आपल्या मित्रांसोबत परिसरातील मैदानात क्रिकेट खेळत होता. खेळादरम्यान एका जोरदार फटक्यामुळे चेंडू रिलायन्स स्मार्ट बाजारच्या आत गेला. मासूम समीर चेंडू आणण्यासाठी दुकानात गेला असता, तेथील एका कर्मचाऱ्याने त्याला काहीही विचारणा न करता पकडले आणि बेदम मारहाण सुरू केली.
प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, कर्मचाऱ्याने समीरला पायाने पकडून जोरात जमिनीवर आपटले आणि त्याला इतके मारले की तो बेशुद्ध पडला. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी समीरला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर सीटी स्कॅनसह आपत्कालीन उपचार करण्यात आले.
या अमानुष प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. घटनेबाबत संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एका निष्पाप मुलावर करण्यात आलेली ही क्रूरता समाजमनाला हादरवून टाकणारी असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.





