खान्देशगुन्हेजळगांव

उच्चदाबाच्या विजेचा शॉक लागल्याने बाप लेकीचा मृत्यू, भाची गंभीर

उच्चदाबाच्या विजेचा शॉक लागल्याने बाप लेकीचा मृत्यू, भाची गंभीर

मास्टर कॉलनीत हृदयद्रावक घटना

जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी घडलेल्या भीषण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उच्चदाबाच्या विजेचा शॉक लागल्याने बाप–लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीत राहणारे मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत होते. शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता मौलानांच्या भाचीने मारिया फतेमाबी हिने गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेल्यानंतर जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा प्रचंड धक्का बसला. आवाज ऐकून धावत गेलेल्या मौलानांची मुलगी आलिया (वय १२) हिलाही विजेचा जोरदार शॉक बसला.

दोघींना वाचवण्यासाठी स्वतः मौलाना साबीर गच्चीकडे धावले असता त्यांनादेखील विजेचा तीव्र झटका बसला. घटनेत मौलाना साबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भाची मारिया फतेमाबी गंभीर जखमी असून तिला तत्काळ सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात मौलानांचा लहान मुलगा थोडक्यात बचावला. परिसरातील नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या अगदी जवळून जाणारी उच्चदाबाची विद्युत वाहिनी हटवण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु महावितरणच्या उदासीनतेमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांसह स्थानिकांनी केला आहे.

परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button