खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

२५१ शस्त्र जप्त, ९८ उपद्रवींवर हद्दपारीची तयारी; २,५०० हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त

जळगाव (प्रतिनिधी) : आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय वातावरणात व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल पूर्णतः सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक प्रतिबंधात्मक कारवाया राबविण्यात येत असून, गुन्हेगारी प्रवृत्ती व उपद्रवी घटकांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील १९ प्रभागांमध्ये एकूण ७५ नगरसेवक पदांसाठी १६९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांवर ५१६ बूथ कार्यान्वित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने राबविण्यात येत आहेत.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शस्त्र परवाना धारकांकडून आतापर्यंत एकूण २५१ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच शहरातून उपद्रवी, दहशत निर्माण करणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ९८ इसम हडपार करण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी ७८ इसमांविरुद्धचे हद्दपारी प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.
यासोबतच काही संशयित व उपद्रवी इसमांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, १५० इसमांना नोटीस देण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी आतापर्यंत ६१ इसमांना नोटीस बजावण्यात आली आहे.
निवडणूक बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिसांकडून भक्कम सुरक्षा यंत्रणा उभी करण्यात आली आहे. त्यामध्ये
०९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६० सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १,०७० पुरुष पोलीस अंमलदार, १३७ महिला पोलीस अंमलदार, यांचा समावेश आहे. याशिवाय ०८ दंगा नियंत्रण पथके, ०२ जलद प्रतिसाद दल, ०१ एसआरपीएफ कंपनी तसेच १,१०० होमगार्ड्स असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button