खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तीप्रदर्शन’; प्रफुल्ल देवकर यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तीप्रदर्शन’; प्रफुल्ल देवकर यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने प्रचाराचा धडाका लावला आहे. महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह संपूर्ण पॅनलने सोमवारी रायसोनी नगर येथून भव्य रॅली काढत विजयाचा निर्धार केला. प्रचाराचा श्रीगणेशा करताना उमेदवारांनी प्रारंभी विश्वेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले. त्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.

या प्रचार फेरीमध्ये आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांनी स्वतः मतदारांशी संवाद साधला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच महायुतीचे ध्येय असून रस्ते, नियमित पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आरोग्य सुविधा हे प्रश्न प्रशासनाशी समन्वय साधून युद्धपातळीवर मार्गी लावले जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रचारादरम्यान संपूर्ण मार्गावर नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी महिलांनी आमदार सुरेश भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि उमेदवारांचे औक्षण केले, तर काही ठिकाणी पुष्पवर्षाव करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, नवनिर्वाचित नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, वैशाली अमित पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभागातील नागरिकांनी यावेळी रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेच्या समस्या नेत्यांसमोर मांडल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत, सत्तेत येताच हे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. या भव्य रॅलीमुळे प्रभाग १३ मधील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button