मोठी बातमी : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
खान्देश टाइम्स न्यूज l मुंबई l ३१ जानेवारी २०२६ l राज्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नियुक्तीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास
शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसंमतीने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला.
लोकभवनात पार पडला शपथविधी
राजभवनातील (लोकभवन) दरबार हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
• राज्यपाल आचार्य देवव्रत
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• राज्याचे मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी
ऐतिहासिक नोंद
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे, मात्र सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाने आणि महायुतीने हा विश्वास टाकला असल्याचे बोलले जात आहे





