खान्देश टाइम्स न्यूज l १३ सप्टेंबर २०२४ l जळगाव l शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण राहण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून महामार्गावर गतिरोधक टाकण्याची विनंती केली होती. अखेर शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
गेल्या १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात होऊन तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर काही जण जखमी देखील झाले होते. या पार्श्वभूमीवर जनमानस संतप्त झाले होते. काही नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये महामार्गावर अपघात होण्याचे जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत असेही आ. भोळे यांनी सांगितले होते.
आमदार राजूमामा भोळे यांच्या सूचनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. बिबानगर पासून कालिका माता मंदिर पर्यंत गतिरोधक टाकण्यात येतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मिळत आहे. यामुळे नागरिकांनी आमदार राजूमामा भोळे यांनी आभार मानले आहेत.