
सौ रजनीताई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
भडगाव/प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या शोधाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या शोधाचे महत्त्व तसेच विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सागर पाटील उपस्थित होते. प्रा. एम. डी बिर्ला यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख व डॉ. सागर सुरेश पाटील यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. जी. शेलार यांनी केले. प्रा. एस. एम. झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. बी. एच. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




