
रमजाननिमित्त गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप
गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने दावते इस्लामी इंडिया या संस्थेच्या सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) तर्फे जळगाव शहरात गरजू कुटुंबांना रमजान रेशन किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.
आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश
वितरित करण्यात आलेल्या प्रत्येक रेशन किटमध्ये दैनंदिन वापरातील आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यात तांदूळ, गहू पीठ, डाळ, साखर, चहा, खजूर, मसाले आदी वस्तूंचा समावेश होता. रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या कुटुंबांना या साहित्याचा उपयोग होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दानदाते व स्वयंसेवकांचे आभार
या प्रसंगी दावते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानदाते व स्वयंसेवकांचे आभार मानले. संस्था पुढेही अशाच प्रकारे मानवसेवेचे उपक्रम राबवत राहील, असे त्यांनी नमूद केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी GNRF जळगाव जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी, शहराध्यक्ष वसीम अत्तारी, तौफीक अत्तारी, अब्दुर्रहीम मदनी, हाफिज सिद्दीक अत्तारी, हाफिज शहबाज जमाली, तौहीद अत्तारी, अकीब अत्तारी यांच्यासह कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.





