
विश्रामगृह ते पिपरुड रोडवर पथदिवे व गतिरोधकांची मागणी
नगरसेविका सिमरन वानखेडे व महिला सदस्यांचे नगरपरिषदेला निवेदन
सावदा | प्रतिनिधी : सावदा शहरातील विश्रामगृह ते पिपरुड रोड (रिंगरोड) या मार्गावर पथदिवे व गतिरोधकांची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे तसेच इतर महिला सदस्यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी वॉकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून त्यात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर रस्ता नव्याने तयार झालेला व रुंद असल्यामुळे वाहतुकीसोबतच पायी फिरण्यासाठीही नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र काही ठिकाणी पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरतो. त्यामुळे विशेषतः महिला व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
स्व. खासदार हरिभाऊ जावळे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आमोदा–पाल राज्यमार्गावर लहान-मोठ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच काही वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्याने येथे लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचीही बाब समोर आली आहे.
तसेच विश्रामगृह चौकात एकाच ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने येथे गतिरोधक नसल्यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी गतिरोधक उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन संबंधित मार्गावर पथदिवे व गतिरोधक उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सिमरन वानखेडे व महिला सदस्यांनी केली आहे.





