
उष्णतेचा कडाका वाढला; जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा घटला
गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांखाली
जळगाव : मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला असून वाढत्या उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात घट होताना दिसत आहे.
१२ मार्चच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सध्या ५९.६४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा आता ५० टक्क्यांखाली गेला आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याचा वापर नागरिकांना सावधपणे करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी मान्सून काळात समाधानकारक पाऊस झाला होता. डिसेंबरपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे भोकरबारी वगळता जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा निर्माण झाला होता. त्यानंतर गिरणा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तन सोडल्यानंतर जलसाठ्याची टक्केवारी सुमारे सत्तरच्या घरात होती.
मात्र मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून सध्या गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांखाली घसरला आहे.





